पनवेल येथील चांगु काना ठाकूर विधी महाविद्यालयात परिसंवाद सभागृहात मराठी वाड्:मय मंडळ व जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने लोकराज्य वाचक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास कोकण विभागाचे उपसंचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शितला गावंड, पंचायत समिती सदस्य ॲङ राज पाटील, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलींद दुसाने आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तर या कार्यक्रमाला नगरसेवक एकनाथ गायकवाड, नगरसेवक संजय भोपी हेही आवर्जून उपस्थित होते. यावेळी लोकराज्य मासिकाच्या सप्टेंबर महिन्याचा “सामर्थ्य शिक्षणाचे समृध्द महाराष्ट्राचे” या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. हातातल्या मोबाईल मध्ये माहितीचा भांडार उपलब्ध आहे. परंतु आयुष्यात यशस्वी होण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. मान्यवरांच्या अनुभवातुन शिकुन अनुभव समृध्द होण्यासाठी वाचन आवश्यक असून त्या दृष्टीने लोकराज्य वाचक अभियानाचे महत्त्व अनन्य साधारण आहे.