• English
  • मराठी

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ‘गाव चलो अभियान’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टीतर्फे व्यापक जनसंपर्कासाठी ‘गाव चलो अभियान’ सुरु झाले आहे. यात भाजपाचे सर्व वरिष्ठ नेते तसेच प्रदेश पदाधिकारी, खासदार, आमदार त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत. त्या अनुषंगाने मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेरे येथे मुक्काम करत समाजातील विविध घटकांशी संवाद साधला. यावेळी विचारांची देवाणघेवाण होत त्यांच्या या अभियानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सरकारी योजनेतील लाभार्थी, शाळा, पोस्ट ऑफिस, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, बचत गट, धार्मिक स्थळांना भेट, नैपुण्य प्राप्त विद्यार्थी व खेळाडू, ज्येष्ठ कार्यकर्ते, नवमतदार, बूथ कमिटी, समाज क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तिमत्व अशा सर्वांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी लाभार्थीची भेट घेत त्यांना मिळालेल्या योजनांची माहिती घेतली तर केवायसी व इतर तांत्रिक कारणामुळे लाभ न घेऊ शकलेल्या नागरिकांनी त्याची पूर्तता करून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. विद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, महिला बचत गट, ग्रामपंचायत कार्यालय यांना सदिच्छा भेट पाहणी केली तसेच या महत्वाच्या गरजांना कायम सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासित केले. यावेळी नवमतदार, ज्येष्ठ कार्यकर्ते समाजातील प्रतिभावंत व्यक्ती तसेच खेळाडूंचीही त्यांनी भेट घेतली व त्यांचा सत्कारही केला. तसेच गावात फिरून त्यांनी लोकांशी संवाद केला त्यांना मोदी सरकारच्या कार्याची माहिती दिली. यावेळी उपजिल्हाधिकारी सायली ठाकूर यांच्या कुटुंबीयांचा, कुस्तीपटू वरुण पाटील व पैलवान शंकर जाधव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विषयक व सुविधांबाबत डॉक्टरांशी चर्चा झाली.